अहमदनगर Live24 टीम, 8 मे 2021 :-टोंमॅटो घेऊन जात असणारा आयशर टेम्पो संगमनेर तालुक्यातील पुणे नाशिक महामार्गावर चंदनापुरी घाटात पलटी होऊन अपघात घडला आहे.
या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. विष्णु पांडुरंग उंबरे (वय 35 रा.गोरडगाव, ता.सिन्नर) असे मृत चालकाचे नाव आहे.
ही घटना शनिवारी दुपारी घडली आहे याबाबत अधिक माहिती अशी कि, आज शनिवारी दुपारच्या सुमारास नारायणगाव (जि.पुणे) येथून आयशर कंपनीचा टेम्पो (एम.एच.15, जी.व्ही.3198) टोमॅटो घेवून नाशिकच्या दिशेने निघाला होता.
दुपारच्या सुमारास हा टेम्पो चंदनापुरी घाटातील खिंडीच्या पुढे उतारावर असतांना वाहनचालकाचे नियंत्रण सुटले. या टेम्पोने रस्तादुभाजकाला जोराची धडक दिली व तो रस्त्यावर उलटला.
दुर्दैवाने टेम्पोच्या खाली सापडून चालकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनातील सगळे टोमॅटो रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने महामार्गावर लाल टोमॅटोचा खच पडला होता.
अपघाताची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग विभागाचे उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनचालकाचा मृतदेह अपघातग्रस्त वाहनाच्या खाली फसला होता तो मृतदेह बाहेर काढण्यात आला.