अहमदनगर Live24 टीम, 17 फेब्रुवारी 2021:- नगर बाजार समितीचे काही दिवसांपूर्वी उघडलेले गेट पुन्हा शहर वाहतूक शाखेने बंद केले असून कुठलीही परवानगी नसताना कुलूप तोडून गेट उघडणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
हे गेट बंद ठेवण्यात यावे, असे पत्र शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी जिल्हा उपनिबंधक तसेच बाजार समिती प्रशासनाला दिले आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे अडीच वर्षापासून बंद असलेले गेट शिवसेनेने आंदोलन करून कुलूप तोडून खुले केले होते.
हे गेट उघडण्याबाबत जिल्हाधिकारी यांचा कोणताही आदेश नसल्याचे स्पष्ट करत बाजार समितीने या घटनेची माहिती तात्काळ जिल्हाधिकारी यांना पत्राद्वारे कळविली आहे.
बाजार समितीचे भुसार यार्डवरील गेट नं.१ ची एकेरी वाहतूक करण्याच्यादृष्टीने २०१८ मध्ये गेटची एक बाजू जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आली होती.
सदर गेट बंद असल्याने व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सदर गेट उघडण्याची मागणी व्यापाऱ्यांनी वारंवार केली होती.
रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा. सदाशिव लोखंडे व जिल्हाधिकारी यांच्याकडे त्या संदर्भात व्यार्पायांनी वारंवार पाठपुरावाही केला होता.
तथापि गेट उघडण्याबाबत प्रशासकीय स्तरावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. अखेर शिवसेनेने आंदोलन करत बंद गेटचे कुलूप तोडून गेट खुले केले. मात्र शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी सदरचे गेट पुन्हा बंद केले आहे.