अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2021 :- जाब विचारल्याचे कारणातून तिघाजणांकडून मायलेकास मारहाण झाल्याची घटना घडली होती.
याप्रकरणी एकमेंकांविरूद्ध मारहाणीची तक्रार देण्यासाठी आलेल्या दोन गटांनी पोलीस ठाण्यातच मारहाण केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान पोलीस ठाण्यातच हा धक्कादायक प्रकार घडल्याने सहाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस नाईक ए. बी. तरटे यांनी फिर्याद दिली असून, रमेश नारायण शेळके, विकास रमेश शेळके,
सुनीता रमेश शेळके (तिघे रा. बोल्हेगाव) व दुसऱ्या गटाचे विमल बाबासाहेब हापसे, दीपक बाबासाहेब हापसे, योगेश बाबासाहेब हापसे (रा. रेणुकानगर, बोल्हेगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शेळके व हापसे गटात शुक्रवारी वाद झाला. या वादातून दोन्ही गट फिर्याद देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले.
पोलीस ठाण्यात आल्यानंतरही दोन्ही गटात वाद झाल्याने पोलिसांनी तो सोडवला. परंतु, पोलीस ठाण्याच्या आवारात वाद घालून कायदा, सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.