अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कायदा – सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाला आहे. दरदिवशी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
नुकतेच नगर तालुक्यातील हिंगणगाव शिवारात पती-पत्नीवर चाकूने हल्ला करून दिवसा चोरी केल्याची घटना घडली. चोरटयांनी जीवघेणा हल्ला करत 5 लाख 42 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याप्रकरणी पोलीस सेवेतून निवृत्त झालेले भाऊसाहेब दगडू ढगे (वय 62 रा. हिंगणगाव ता. नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, मंगळवारी दुपारी ढगे कुटुंब हिंगणगाव शिवारातील शेतामध्ये काम करत होते. यावेळी त्यांच्या घराला कुलूप होते.
चोरट्यांनी डाव साधत ढगे यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. रोख रक्कम, दागिने असा ऐवज घेऊन निघण्याच्या तयारीत असताना भाऊसाहेब ढगे व त्यांच्या पत्नी घराकडे आल्या.
चोरट्यांना पाहून ढगे पती-पत्नीने त्यांना पकडण्याचे धाडस केले. चोरट्याने भाऊसाहेब ढगे यांच्या हातावर व त्यांच्या पत्नीच्या तोंडावर चाकूने हल्ला करून त्यांना जखमी केले. गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सदाशिव कणसे करीत आहेत.