कुलूप तोडून चोरटे बंगल्यात घुसले आणि रोकड केली लंपास

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :-  गुन्हेगारीमध्ये सातत्याने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत असलेला नगर जिल्हा गुन्हेगारीचे विक्रम तोडत आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे.

एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र अपेक्षित गुन्ह्याची उकल होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. नुकतेच नेवासा तालुक्यात पाचेगाव येथे बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून १५ हजार रुपये रोख व मोबाइल चार्जर चोरी गेल्याची घटना घडली आहे.

दिनेश दत्तात्रय कुलकर्णी (वय ७०, धंदा-शेती) यांचा पाचेगाव येथे रस्त्यालगत बंगला असून त्यांची दोन्ही मुले नोकरीनिमित्त श्रीरामपूर येथे राहतात. याबाबत अधिक माहिती अशी कि, दिनेश कुलकर्णी हे बंगला बंद करून आपल्या मुलाकडे गेले होते.

याच संधीचा फायदा घेत मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरातील, कपाटातील साहित्याची उचकापाचक केली.

गादीखाली ठेवलेल्या पुस्तकातील १५ हजार रुपये रोख व शंभर रुपये किमतीचा एक मोबाइल चार्जर असा एकूण १५ हजार शंभर रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. चोरी प्रकरणाचा नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

पुढील तपास नेवासा पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मोहन शिंदे हे करीत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24