अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-ठाणे येथील वारीमाता गोल्ड ज्वेलर्स दुकानातून तब्बल १ कोटी ३७ लाखांचे सोने, चांदीचे दागिने चोरीला गेल्याच्या प्रकरणात सुलतान आबुल शेख, अब्दुल भादू शेख हक, आलमगीर जब्बार शेख या आरोपींचा सक्रिय सहभाग असल्याची बाब समोर आली आहे.
महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्स दुकानात चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, ही बाबही चौकशीत समोर आली आहे. या प्रकरणात पटना येथून विमानाने मुंबईत आलेल्या तीन आरोपींना कासारवडवली पोलिसांनी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन ताब्यात घेतले.
मुळचे झारखंडचे असलेल्या आरोपींचा या गुन्ह्यामध्ये सक्रिय सहभाग आहे. या आरोपींचा पुण्यातही ज्वेलर्स दुकान फोडून चोरी करण्याचा डाव होता. त्यासाठी ते आले होते. मात्र वेळीच त्यांच्या मुसक्या आवळल्या. ठाण्यातील शिवाईनगर परिसरात असलेल्या वारीमाता ज्वेलर्सचे दुकान चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास फोडले होते.
दरोडेखोरांनी दुकानातून ३ किलो सोने आणि चांदी लूटून नेली होती. ज्वेलर्स दुकानाच्या बाजूच्या गाळ्यात चोरट्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरू करून रात्रीच या ज्वेलर्सच्या भिंतीला भगदाड पाडून ही लूट केली होती. वर्तकनगर पोलीस ठाण्यात १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दुकानाच्या बाजूचा गाळा एका फळविक्रेत्याने दोन महिन्यांपूर्वी २८ हजार रुपयांच्या मासिक भाड्यावर घेतला होता. परराज्यातील एका व्यक्तीला दुकान मालकाने फारशी चौकशी न करता केवळ अधिक भाडे मिळत असल्याने हे दुकान भाड्याने दिले होते. गेल्या दोन महिन्यांपासून फळविक्रीचा व्यवसाय केवळ नावापुरता केला जात होता.
पहाटेच्या सुमारास फळविक्रेत्याने दुकान आणि ज्वेलर्समधील भिंत फोडून ज्वेलर्समध्ये प्रवेश केला. दुकानातील तिजोरी गॅस कटरने कापून त्यातून ३ किलो सोने घेऊन फरार झाले. पूर्वनियोजित हा दरोडा टाकण्यात आला होता. ठाणे पोलिसांनी पाटणा येथून विमानाने मुंबईत आलेल्या तिघांना विमानतळावरून ताब्यात घेतले.
त्यांची चौकशी केली असता, या दरोड्यात त्यांचा सक्रिय सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे सर्व आरोपी मूळचे झारखंडचे आहेत. महत्वाचे म्हणजे आरोपी पुण्यात ज्वेलर्समध्ये चोरी करण्यासाठी विमानाने आले होते, अशी माहिती चौकशीत उघड झाली आहे.