अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- एका घरातील उचकटून चोरटयांनी बावीस तोळे सोन्याचे दागिने, ६५ हजारांची रोकड असा ८ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला.
चोरीची घटना नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे घडली आहे. याबाबत शामसुंदर धोंडिराम खेसे (रा. कुकाणा, ता. नेवासा) यांनी याबाबत नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील गुन्हेगारीची रेकॉर्डब्रेक कामगिरी सुरु आहे. मात्र पोलीस यंत्रणा या घटनांना आळा घालण्यास अयशस्वी ठरत असल्याचे वारंवार दिसून येत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, शामसुंदर खेसे यांचा मुलगा ऋषिकेश याचे २० जून रोजी लग्न असल्याने त्यांच्या घरी मुलगी सोनाली व इतर पाहुणे आलेले होते.
शुक्रवारी रात्री १२.३०च्या दरम्यान घरातील सर्वजण कामे आटोपून घराचे दरवाजे बंद करून झोपी गेले होते. त्यानंतर खेसे यांची मुलगी सोनालीला जाग आल्यानंतर तिने पाहिले की, घरातील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडा असून घरी चोरी झाल्याचे लक्षात आहे.
त्यामध्ये १ लाख ६० हजार रुपयांचा चार तोळ्याचा शाहीहार, ३ लाखांचे साडेसात तोळ्याचे दोन गंठण, २ लाखांच्या ५ तोळ्याच्या आठ अंगठ्या, १ लाखाचे अडीच तोळ्याचे झुंबर,
दीड लाखाचा तीन तोळ्याचा राणीहार, ६५ हजाराची रोकड असा ८ लाख ८५ हजाराचा ऐवज चोरी गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी नेवासा पाेलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.