अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2022 :- जिल्ह्यासह नगर शहरात दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना वाढत असताना पोलिसांकडून चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही.
दुचाकी चोरी करणार्या टोळ्यांचा शोध लावण्यात पोलिसांना अपयश आले आहेत. यामुळे दररोज नगर शहरातून दुचाकी चोरीला जात आहेत.
दरम्यान कोतवाली व तोफखाना हद्दीतून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या फिर्यादी ठाण्यात दाखल झाल्या आहेत. सावेडी उपनगरातील सोनानगर चौक येथे राहणारे सोनार सुधीर उमाकांत कुलथे (वय 52) यांची दुचाकी त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली.
याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच स्वस्तिक बसस्थानक परिसरात उभी केलेली दुचाकी चोरीला गेली आहे.
याप्रकरणी देविदास महादेव वीरकर (वय 29 रा. शाहूनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी त्यांची दुचाकी स्वस्तिक बसस्थानकातील प्रसाधनगृहासमोर उभी केलेली होती.
अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली. वीरकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. तर कायनेटिक चौकाजवळ असलेल्या रविश कॉलनीमधून दुचाकी चोरीला गेली आहे.
याप्रकरणी प्रकाश प्रभाकर कांबळे (वय 26 रा. चिलेखनवाडी ता. नेवासा, हल्ली रा. रविश कॉलनी) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दरम्यान त्यांनी त्यांची दुचाकी घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने ती चोरून नेली.