अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-श्रीरामपूर शहरासह परिसरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. नुकतेच चोरटयांनी एका व्यक्तीच्या घरात चोरी करून चोरट्यांनी संबंधित व्यक्तीस मारहाण केल्याची घटना घडली आहे.
तर दुसऱ्यामहिलेच्या गळ्यातील गंठण चोरट्यांनी चोरून नेले आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर शहरातील अरविंद डावखर यांच्या मळ्यात एका घरात काल पहाटेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मारहाण करुन जबरी चोरी केली.
लोखंडी रॉड, धारदार चाकू, लाकडी दांड्याने मारहाण केल्याने एक महिला जखमी झाली आहे. या भागात मंजित सूनार यांचे घर असून त्यांना भेटण्यासाठी लोकबहादूर प्रजित सूनार,
कुणंती लोकबहादूर सूनार (रा.जयराम कॉलनी, पाचोरा, जि.जळगाव) हे काल शहरात आले होते. रात्री जेवण झाल्यानंतर मंजित सूनार कामासाठी घराबाहेर पडला आणि लोकबहादूर घरी झोपलेले होते.
पहाटे तीन वाजेच्या सुमारास चार अज्ञात चोरट्यांनी मंजित यांच्या घराचा दरवाजा लाथा मारुन हत्याराने तोडत घरात प्रवेश केला. आवाज आल्यानंतर लोकबहादूर जागे झाले; परंतु चोरट्यांनी त्यांना मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच डोक्यात रॉड मारुन हातावर चाकूने वार केले. त्यात ते जखमी झाले. यावेळी चोरट्यांनी लोकबहादूर यांच्या पाकिटातील 11 हजार रुपये आणि पत्नीच्या गळ्यातील नऊ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण घेवून धूम ठोकली.