अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- कोरोना दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. गर्दी होणार नाही यासाठी अजूनही अनेक निर्बंध लागू आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही करोना रुग्ण वाढले तर पुन्हा एकदा कठोर निर्णय घ्यावा लागेल, असं स्पष्ट केलं आहे. त्यातच करोनाची तिसरी लाट आधीच आली आहे, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.
मुंबईत सोमवारी ३७९ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली होती. तर ४१७ रुग्णांनी करोनावर मात केल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. मुंबईत आतापर्यंत ७ लाख २४ हजार ४९४ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ९७ टक्के आहे. तर ३ हजार ७७१ सक्रिय रुग्ण आहेत. करोना दुप्पटीचा दर १२९० दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत ३० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर करोना रुग्णवाढीचा दर ०.०६ टक्के इतका होता.
“माझं घर माझा बाप्पा, माझं मंडळ माझा बाप्पा अशी संकल्पना आणली आहे. माझ्या गणपतीला सोडून कुठेही जाणार नाही. यामुळे लोकं इकडे तिकडे फिरणार नाही. बिना मास्कचे तिथे बसणार नाही.
मंडळातील सदस्यही जबाबदारी घेत आहेत. मी कुठेच जाणार नाही. तिसरी लाट येणार आहे, असं नाही. आली आहे.” असं महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.