अहमदनगर Live24 टीम, 21 मे 2021 :- देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर कहर सुरू आहे. दैनंदिन रुग्ण संख्या तीन लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ही लाट थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला देशाला सामोरे जावे लागणार आहे. आतापासूनच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबतची चिंता व्यक्त केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत ही लाट येईल, येणार नाही, अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सध्यातरी कुणी विश्वासपूर्वक काही सांगू शकत नाही. मात्र येणाऱ्या काळात विषाणूमध्ये म्युटेशन झाले तर त्याचा मुलांना धोका उद्भवू शकतो.
त्यामुळे मुलांचा विचार करू इंफ्रास्ट्रक्चर तयार करणे गरजेचे आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी व्हिडीओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून कोरोना विषाणूच्या सद्यस्थितीबाबत आणि लसीकरणावर ९ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली.
यावेळी डॉ. हर्षवर्धन यांनी ब्लॅक फंगस या आजाराबाबत चिंता व्यक केली. यावेळी मार्गदर्शन करताना हर्षवर्धन म्हणाले की, कोरोनाविरोधातील लसीकरणा वाढवण्याची गरज आहे. आमच्याकडे ज्या काही लसी आहेत त्या आपण लवकरात लवकर द्याव्या लागतील.
तसेच येणाऱ्या महिन्यांत लसीच्या निर्मितीमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. कोरोनाचे रुग्ण कमी झाले असले तरी ब्लॅक फंगसने चिंता वाढवली आहे.
अनेक राज्यांमध्ये ब्लॅक फंगसच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ झाली आहे. त्याबाबत केंद्र सरकारकडूनही चिंता व्यक्त करून सर्व राज्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. तसेच अनेक राज्यांनी ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे.