अहमदनगर Live24 टीम, 29 जून 2021 :-कोविड -१९ वरील उच्चस्तरीय मंत्री गटाची २९वी बैठक केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या अध्यक्षतेखाली आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली या बैठकीत मंत्रीगटाने कोविड प्रतिबंधक योग्य वर्तनाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे.
यामध्ये सहभागी असलेल्या’आयसीएमआर’चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी कोविड-१९ ची दुसरी लाट अजूनही ओसरलेली नाही, कारण अजूनही देशातील ८० जिल्ह्यांमध्ये उच्च पॉझिटिव्हिटी दर आहे, अशा शब्दात सावधगिरीची सूचना दिली.
मास्कचा वापर आणि हातांच्या स्वच्छतेच्या फायद्यांवर यावेळी भर देण्यात आला. कोविड व्यवस्थापनासाठी आणि देशभरात कोविड लसीकरणाची व्याप्ती आणि गती वाढवण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले त्या सर्वांचे मंत्री गटाने कौतुक केले.
डॉ. हर्ष वर्धन यांनी सुरुवातीला कोविड -१९ ला आळा घालण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. ते म्हणाले , गेल्या २४ तासांत आपल्याकडे केवळ ४६,१४८ नवीन रुग्णांची नोंद झाली असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ५,७२,९९९ पर्यंत खाली घसरली आहे.
रुग्ण बरे होण्याचा दर सतत वाढत आहे आणि आज तो ९६.८० टक्के आहे. कोविड-१९ लसीकरण मोहिमेबाबत बोलताना डॉ. हर्ष वर्धन म्हणाले, लसीकरणात भारताने आणखी एक मैलाचा दगड गाठला आहे आणि आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसींच्या मात्रांमध्ये अमेरिकेला मागे टाकले आहे.
महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या राज्यांमध्ये रुग्णवाढीचा दर राष्ट्रीय रुग्णवाढ दरापेक्षा अधिक असून उपचाराधीन रुग्णांची संख्या देखील अधिक आहे.