मुसळधार पावसाने नगरकरांच्या नाकीनऊ आणले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :-अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आलेल्या दमदार पावसाने नगरकरांना मनसोक्त भिजवले. नगर शहरासह जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे.

पावसाच्या या दमदार आगमनाने नगरकर सुखावले असले तरी अनेक ठिकाणी या जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे पर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने या आठवड्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला होता. नगर जिल्ह्यात दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर पावसाने सोमवारी दुपारनंतर हजेरी लावली.

नगर शहरात सोमवारी दुपारी तुरळक पाऊस झाला. सायंकाळनंतर पावसाने जोर धरला. विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. रात्रभर पडणारा पाऊस मंगळवारी दुपारी उघडला. या पावसाने नगर शहरासह तालुक्याला झोडपून काढले. यामुळे शहरातील सखल भागात पाणीच पाणी झाले.

दरम्यान या मुसळधार पावसामुळे सीना नदीला पूर आल्याने नगर-कल्याण महामार्गावरील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक खोळंबली होती. सीनाकाठच्या वस्त्यांमध्ये घरात पाणी शिरले होते. नगर शहरातील नालेगाव, सावेडी, नागापूर या महसूल मंडलांत दमदार पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पाऊस हा भिंगार मंडलात 119 मिलीमीटर झाला आहे.

या मुसळधार पावसाने शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. विशेषत: सखल भागात मोठे पाणी साचले होते. मात्र शहरातून जाणाऱ्या राज्यमार्गावरूनही पाणी साचल्याने काही वेळ लांब पल्ल्याची वाहतूकही काही वेळ थंडावली होती. पाण्याचा जोर कमी झाल्यानंतर हळूहळू वाहतूक व्यवस्था पुर्वव्रत झाली.

आम्ही सज्ज आहोत…मनपाचे आवाहन

नगर शहरामध्ये पूर परिस्थिती मोठ्या प्रमाणात उद्भवल्यास महानगरपालिकेची आपत्कालीन विभागाची पथके सज्ज आहेत. नागरिकांनी पूर परिस्थिती उद्भवल्यास काही अडचणी असल्यास त्वरित अहमदनगर महापालिकेत संपर्क साधावा, असे आवाहन मनपाने केले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24