अहमदनगर Live24 टीम, 1 जून 2021 :- जिल्ह्यातील वाढती वाळू तस्करी पाहता प्रशासनाकडून अनेकदा कारवाई करण्यात आली आहे. अनेकदा वाळू तस्कराचे पकडलेले वाहन तस्कर सरकारिया कार्यालयाच्या आवारातून लंपास करतात. असाच काहीसा प्रकार श्रीगोंदा तालुक्यात घडला आहे.
श्रीगोंदा मध्ये अधिकार्यांनी पकडलेला वाळूचा ट्रक श्रीगोंदा तहसील आवारातून गायब झाला होता. दरम्यान असे घडल्या नंतर तर चर्चेला उधाण आले. चर्चा पसरू लागल्यानंतर काही वेळात तहसीलच्या आवारातून गेलेला तो ट्रक पुन्हा आवारात आला.
मात्र धक्कादायक बाब म्हणजे त्यातील वाळू गायब झाली होती. याबाबत माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे यांनी रविवारी रात्री एका वाळू वाहतूक करणार्या ट्रकवर कारवाई केली. तो ट्रक जप्त करत तहसील कार्यालयाच्या आवारात आणून उभा केला.
यानंतर तो ट्रक कार्यालयाच्या आवारातून गायब झाला. कारवाईची चर्चा होताच पुन्हा तोच ट्रक वाळू खाली करत पुन्हा रिकामा करून माघारी तहसील आवारात आणण्यात आला.
अधिकार्यांनी आर्थिक तडजोड केली की राजकीय दबावाला बळी पडून ट्रक सोडला ? अशी चर्चा शहरात सुरू आहे. याबाबतची सखोल चौकशी करून सदर ट्रक चालक व मालकावर कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.