जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चोऱ्या, लुटमारी, दरोडे आदी घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे . यामुळे नागरिकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र गुन्हेगारांना आळा बसावा यासाठी पोलीस प्रशासन देखील नेहमीच सतर्क असते.
नुकतेच दोघा चोरटयांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. नगर शहराजवळील भिंगारमधील कापुरवाडी येथे दिवसा चोरी करणार्या माका (ता. नेवासा) येथील दोघा सख्या भावांना भिंगार पोलिसांनी अटक केली.
राजु एकनाथ पिटेकर व त्याचा भाऊ सतिष एकनाथ पिटेकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, कापुरवाडी येथील गणेश मगर यांच्याकडे पिटेकर बंधू चालक म्हणून 15 दिवस कामाला होते.
त्यांनी मगर यांच्या घरातून दिवसा 24 हजार रूपये व 28 हजार रूपयांचे सोन्याचे दागिणे चोरून नेले होते. याप्रकरणी मगर यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
या गुन्ह्यातील आरोपी नगर शहरातील स्टेट बँक चौकात आले असल्याचे माहिती मिळताच पोलीस पथकाने सापळा लावून आरोपी पिटेकर बंधूंना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 11 हजार रूपये रोख व सोन्याचे दागिणे असा 14 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.