अहमदनगर Live24 टीम, 7 जुलै 2021 :- वाळू वाहतूक करीत असल्याचे सांगून पैसे मागणार्या पारनेर पोलीस स्टेशनचे दोन पोलीस कॉन्स्टेबल व पोलीस निरीक्षक यांनी बनावट कारवाई केल्याचा आरोप तक्रारदार गोवर्धन बाळासाहेब गुंड यांनी केला आहे.
सदर प्रकरणी गुंड यांनी पोलीस अधिक्षक यांची भेट घेऊन पैश्याची मागणी करणार्या सदर पोलीसांवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. या प्रकरणी न्याय न मिळाल्यास पोलीस अधीक्षक कार्यालया समोर दि.13 जुलै रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
गोवर्धन बाळासाहेब गुंड कातळवेढा (ता. पारनेर) येथे शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यांच्याकडे पोकलॅण्ड मशीन व डंपर आहे. 25 जून रोजी गुंड बोटा येथे नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी सायंकाळी पाचच्या सुमारास गेलेले होते.
त्यांचा डंपर खडकवाडी येथे चौधरी यांच्या घराजवळ जमिनीचे काम चालू असल्यामुळे उभा होता. पारनेर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सत्यम शिंदे, भालचंद्र दिवटे व पोलीस निरीक्षक बळद यांच्या मध्यस्थांमार्फत वाळू वाहतूक करीत असल्याबाबत हप्त्यापोटी 25 हजारांची मागणी करण्यात आली.
गुंड यांनी कोणत्याही प्रकारचा वाळू उपसा व वाळूची वाहतूक करीत नसल्यामुळे सदर रक्कम देण्यास नकार दिला. याचा राग येऊन त्यांनी संध्याकाळी सहाच्या सुमारास सदर पोलीसांन उभ्या असलेल्या डंपर जवळ येऊन सदर डंपर जाधव यांच्या घराजवळ घेऊन जाऊन तेथे असलेली पूर्वीची वाळू ही त्या डंपर मध्ये बेकायदेशीर भरली.
गुंड यांचे नातेवाईक वैभव बबन चौधरी व संकेत जाधव यांनी सदर ठिकाणी जाऊन सदरील वाळू न भरण्याबाबत पोलीसांना सांगितले असता, त्यांनी चौधरी व जाधव यांना जबर मारहाण केली. वाळू भरीत असल्याबाबत मोबाईलवर फोटो काढत असताना सत्यम शिंदे या कॉन्स्टेबलने मोबाईल हिसकावून तेथेच फोडला. सदर डंपर पोलीस चालवीत पारनेर येथे घेऊन जात असताना टाकळी चौकात डिझेल संपल्यामुळे बंद पडला.
सदर घटना समजल्यानंतर गुंड पारनेर पोलीस स्टेशन येथे रात्री 8 ते 9 वाजल्याच्या सुमारास दाखल झाले. पोलीस स्टेशनला पोलीस कर्मचारी शिंदे, दिवटे व पोलीस निरीक्षक बळद हजर होते. त्यावेळी त्यांनी कारवाई करण्याबाबत सांगितले. त्यानंतर मध्यस्थांमार्फत केस न करण्याबाबत दोन लाखाची मागणी केल्याचा आरोप तक्रारदार गुंड यांनी केला आहे.
एवढी रक्कम नसल्यामुळे 26 जून ला सकाळी 11 सुमारास रक्कम जमा करून मध्यस्थामार्फत देण्याचे ठरले. त्यानंतर पोलिसांनी माझ्याकडे शिरूर येथील वाळूचा परवाना असल्याबाबतची पावती शिरूर येथील लिलाव धारकाकडून मागून घेतली व सदरील पावतीच्या आधारे मी त्यांना दोन लाख देत असल्यामुळे माझे सदरचे वाहन सोडून दिले.
परंतु एवढी मोठी रक्कम जमवाजमव न करता आल्यामुळे व अन्याय होत असल्याने लाचलुचपत विभाग पुणे यांच्याकडे 26 जून रोजी पहाटे चारच्या सुमारास मोबाईलवरुन ऑनलाईन तक्रार दाखल केली. त्यांनी नगर येथील त्यांचे संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती कळवली. परंतु दरम्यान संबंधित विभागाच्या कर्मचार्या मार्फत सदरील पारनेर पोलीसांकडे लाचलुचपत विभागकडे तक्रार केल्याची बातमी लिक झाली.
सदरील पोलीस निरीक्षक व दोन पोलिसांनी मध्यस्थामार्फत दिलेली रक्कम स्वीकारली नाही. यापुर्वी देखील त्यांनी दोन खोटे गुन्हे दाखल केल्याचे निवेदनात गुंड यांनी म्हंटले आहे. सत्यम शिंदे पोलीस कर्मचारी भाळवणी येथील वाळू तस्कराच्या वाढदिवसासाठी हजर होता. त्याबाबत लेखी तक्रार करुन देखील कोणतीही कारवाई झालेली नाही.
याचा गैरफायदा घेऊन संबंधित पोलिस स्टेशनचे कर्मचारी यांना वाळू तस्करकडून लाखो रुपयांची माया जमा करीत आहे. सदरील पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीसांकडे असलेल्या सर्व गुन्ह्यांची वरिष्ठां मार्फत तपासणी करण्यात यावी, मोबाईल नंबर रेकॉर्डवर घेऊन त्यांचे अवैध व्यवसाय करणार्या किती व्यक्तींशी संबंध असल्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.