अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळापासून वास्तव करणारा कोरोना आजही कायम आहे. कोरोनाची वाढ अद्यापही कायम असताना एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
दिवसेंदिवस घटत्या रुग्णांची संख्या व प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे केडगावची वाटचाल कोरोनामुक्तीकडे सुरु आहे. कोरोनाची दुसरी लाट केडगावकरांंसाठी खूपच धोकादायक ठरली होती.
मात्र, या भीतिदायक वातावरणातून केडगाव आता सावरत आहे. येथील सक्रिय रुग्णांंची संख्या केवळ सातवर पोहोचली आहे. धोका पूर्ण टळलेला नसल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
केडगावमध्ये आतापर्यंत २ हजार ७०० जणांना कोरोनाची बाधा झाली. यातून जवळपास ९२ टक्के रुग्ण बरे झाले. सप्टेंबर महिन्यात केडगावमध्ये २८ कोरोनाबाधित होते. यातील २१ रुग्ण बरे झाले.
सक्रिय रुग्णांची संख्या केवळ ७ राहिली. रुग्णसंख्येत मोठी घट होत असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नाही. यामुळे नागरिकांनी कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करून काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी गिरीष दळवी यांनी केले.
२१ हजार जणांचे लसीकरण पूर्ण :- केडगावात आतापर्यंत २१ हजार जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. सध्या कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा होत आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे लसीकरण झाले नाही, त्यांनी लसीकरण करावे, असे आवाहन दळवी यांनी केले.