‘त्या’परिसरातील ग्रामस्थ म्हणतात आता दोन बिबटे ! मात्र वनविभागाचे अधिकारी म्हणतात हे तरस आहे!

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथे दोन बिबटे पाहिलले असून याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा तरस असल्याची माहिती दिली आहे.

जेऊर परिसरातील जरे वस्ती येथे चार दिवसांपूर्वी अपघातात एका ७ वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाला होता. या बिबट्यासोबत दोन बछडे असल्याचे अनेक नागरिक सांगत आहेत.

जरे वस्ती परिसरात राम शंकर तोडमल यांनी घराशेजारी असणाऱ्या उसाच्या शेताजवळ दोन बिबट्यांचे बछडे पाहिले असल्याचे ग्रामपंचायत कार्यालयात येऊन सांगितले.

माजी उपसरपंच बंडू पवार यांनी याबाबतची माहिती वनविभागाला दिली. जेऊर परिसरात बिबटे पाहिल्याचा संदेश ग्रामसुरक्षा यंत्रणेद्वारे ग्रामस्थांना देण्यात आला.

त्यानंतर वनविभागाच्या वतीने घटनास्थळी भेट देवून ठसे तपासणी केली. त्यावेळी ठसे बिबट्यांचे नसून तरसाचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

जेऊर परिसरात बिबट्याचे दोन बछडे फिरत असल्याचे अनेक जणांनी पाहिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येदेखील संभ्रम निर्माण झाला आहे.

यापूर्वीही या परिसरात बिबट्याचे वास्तव्य आढळून आलेले आहे, त्यामुळे नागरिकांनी दक्षता पाळण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने केले आहे.

Ahmednagarlive24 Office