अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- महिलांना सर्व क्षेत्रात समान संधी उपलब्ध आहे. त्या संधीचे सोने करून घेतले पाहिजे. अवकाशात गवसणी घालण्यासाठी पंखात बळ निर्माण करण्याचे काम जागतिक महिला दिनी केले जाते. स्त्री ही जन्मदाती, प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजविणारी, संस्कृती जपणारी तर घराचे घरपण आहे. शेतातील मजुरी करण्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत स्त्रियांनी उंच भरारी घेतली आहे.
स्त्रियांच्या सन्मानाची सुरुवात स्वत:च्या घरापासून झाली पाहिजे. मुलीला मर्यादा शिकवताना, मुलाला देखील महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार रुजविण्याची गरज असल्याची भावना नगरसेविका शीतल जगताप यांनी व्यक्त केली. परीस फाऊंडेशन, नेहरू युवा केंद्र, जय असोसिएशन ऑफ एन.जी.ओ. (महाराष्ट्र राज्य), जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने भिस्तबाग चौक, सावेडी येथे जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात धुणी-भांडी व घरकाम करणार्या महिलांचा सन्मान करण्यात आला.
तसेच कोरोनाची जनजागृती करून महिलांना मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी अध्यक्षीय भाषणात सौ.जगताप बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका दिपाली बारस्कर, परीस फाउंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. भानुदास होले, राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे जिल्हाध्यक्ष अॅड. महेश शिंदे, अॅड. अनिता दिघे, अॅड. पुष्पा जेजुरकर,
डॉ. संतोष गिर्हे, वैशाली कुलकर्णी, पोपट बनकर, रंजना वाघचौरे, वर्षा काळे, मयुरी कराळे, सुवर्णा तनपुरे, जयेश कवडे, आकाश काळे, प्रीती औटी आदी उपस्थित होते. यावेळी धुणीभांडी व घरकाम करणार्या दुर्गा दानवे, अनिता ठोंबरे, सुरेखा साठे, अलिशा साळवे, सुरेखा चव्हाण, रुपाली कदम, दिपाली गायकवाड, कोमल गायकवाड आदींसह इतर महिलांना गृहपयोगी वस्तू व पुस्तके भेट देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते परीस फाऊंडेशनच्या कार्यालयाच्या फलकाचे अनावरण करण्यात आले. प्रास्ताविकात परीस फाउंडेशनच्या अध्यक्षा निकिता वाघचौरे यांनी संस्थेच्या माध्यमातून तळागाळातील वंचित घटकांसाठी, ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी कार्य केले जाणार आहे.
तसेच बालकांची बौद्धिक चाचणीद्वारे त्यांच्या बुध्यांक ओळखून त्यांच्या आवड व क्षमतेनूसार मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगितले. नगरसेविका दीपाली बारस्कर म्हणाल्या की, महिला सक्षमीकरण मोहीम कागदावर न रंगविता प्रत्यक्ष कृतीतून दिसली पाहिजे. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे. महिला दिन एक दिवसापुरता मर्यादित न ठेवता वर्षभर महिलांचा सन्मान व आदर झाला पाहिजे.
यामुळे महिलांवर होणार्या अन्याय, अत्याचार रोखले जाणार आहे. महिलांचा सन्मान ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. धावत्या जगात महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच वैद्यकीय उपाययोजना करण्याचे आवाहन त्यांनी केले. उपस्थित पाहुण्यांनी सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. अनिता दिघे यांनी केले. आभार जयेश कवडे यांनी मानले.
कार्यक्रमासाठी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक शिवाजी खरात, जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील, क्रीडा अधिकारी नंदकिशोर रासने, क्रीडा मार्गदर्शक विशाल गर्जे, ज्ञानेश्वर खुरांगे, राजश्री पाटेकर, कविता दरंदले, वैशाली उतेकर, वंदना गोसावी आदींचे मार्गदर्शन लाभले.