नेवाश्यातील त्या हत्येला महिना उलटला मात्र आरोपी अद्यापही फरारच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 जुलै 2021:- नेवासा तालुक्यातील चांदा येथील एका तरुणाची हत्या होऊन महिना उलटला मात्र अद्यापही आरोपींना अद्यापही अटक नाही.

तसेच तालुक्यात गुन्हेगारी वाढू लागली असूनही पोलीस यंत्रणा काहीच करताना दिसत नाही. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी यासंदर्भात गृहमंत्र्यांना निवेदन पाठविले आहे तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनाही या निवेदनाची प्रत दिली.

सविस्तर वृत्त असे कि, चांदा येथील नदीजवळ भरचौकात 3 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास ज्ञानदेव सोपान दहातोंडे (वय 42) या तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करून हल्लेखोर पळून गेले होते.

या घटनेला महिना उलटत आला असून अजुनही या प्रकरणातील आरोपींना अटक झाली नाही. या संदर्भात पोलिसांच्या कारभाराबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली. तसेच गावात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत.

दादागिरी, गुंडगिरी वाढली असून सामान्य जनतेला त्याचा प्रचंड त्रास होत आहे. गावात गावठी कट्ट्यासारखी हत्यारे मोठ्या प्रमाणावर असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

या सर्व प्रकरणात पोलिसांकडूनकोणतीच कारवाई होत नसून उलटपक्षी पोलिसांचे गुन्हेगारांना अभय असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

जाणीवपूर्वक आरोपीना अभय देणाऱ्या अधिकार्‍यांवर कारवाई करावी तसेच दहातोंडे हत्याकांडातील आरोपीना अटक करावी या मागण्यांसाठी मंगळवार 6 जुलै रोजी गाव बंद ठेवण्यात येणार आहे असे निवेदनात म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24