अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- डॉ. तनपुरे कारखान्याच्या कामगार आज सोमवार दि.23 पासून आपल्या न्यायहक्कासाठी कारखाना कार्यस्थळावर उपोषणाला बसणार आहेत.
यामुळे आता कारखाना आणि कामगार यांच्यातील संघर्ष पेटणार असे चिन्हे दिसून येऊ लागली आहे. कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या काळातील दि.1 ऑगस्ट 2017 ते 31 ऑगस्ट 2021 अखेर थकित वेतन , वेतन आयोगाचा थकित फरक, भविष्य निर्वाह निधी,यांसह अनेक गोष्टींसाठी कामगारांनी उपोषण, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कामगारांनी दहा दिवसांपूर्वी तहसीलदार फसियोद्दीन शेख, सहाय्यक कामगार आयुक्त, कारखाना व पोलीस प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली. उपोषणाला बसणार्या कामगारांनी राहुरी येथे शनी मंदिरात थकित रकमा घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, यावर ठाम असल्याचे सांगितले.
कामगार नेते इंद्रभान पेरणे म्हणाले, मागील पाच वर्षात कामगारांचे 25 कोटी 36 लाखांची थकबाकी आहे. थकबाकी दिली नाही तर आज सोमवारपासून अन्नत्याग करून आमरण उपोषण, थाळीनाद, जागरण गोंधळ, घंटानाद, अर्धनग्न आंदोलन, रास्तारोको अशी टप्प्याटप्प्याने आंदोलनाची तीव्रता वाढविली जाईल.
आठ दिवसांनंतर सामूहिक आत्मदहन केले जाईल. दरम्यान सहाय्यक कामगार आयुक्त नगर, कारखाना व्यवस्थापन व कामगारांची बैठक झाली. परंतु, कोणताही तोडगा निघाला नाही.