अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी आंदोलनाचा पविञा उचलला आसुन मागील पाच वर्षांतील थकीत पगार व इतर थकबाकीसाठी
उद्या सोमवारी दि.२३ रोजी सकाळी 10 वाजेपासून बेमुदत उपोषण, विविध तीव्र आंदोलने करुन, व्यवस्थापनास जाग आली नाही तर आठ दिवसांनंतर सामुहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाच्या काळातील 1 ऑगस्ट २०१७ ते ३१ ऑगस्ट २०२१ अखेर थकित वेतन, वेतन आयोगाचा थकित फरक, भविष्य निर्वाह निधी, उपादान निधी, रिटेंशन अलौन्सची थकबाकी यासाठी कामगारांनी उपोषण, आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कामगारांनी 10 दिवसापूर्वी तहसीलदार एफ.आर. शेख, सहाय्यक कामगार आयुक्त, कारखाना व्यवस्थापन व पोलिस प्रशासनाला आंदोलनाची नोटीस दिली. उपोषणाला बसणार्या कामगार नेत्यांनी राहुरी येथे शनी मंदिरात थकित रकमा घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही.
अशी शपथ घेतली. सहाय्यक कामगार आयुक्त (नगर), कारखाना व्यवस्थापन व कामगारांची दोन दिवसापुर्वी बैठक घेतली. परंतु या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही. कारखान्याचे अध्यक्ष नामदेव ढोकणे व संचालक मंडळाने कामगारांशी चर्चा करून, आंदोलनापासून परावृत्त व्हावे यासाठी प्रयत्न केले.
परंतु त्यास यश आले नाही. कामगार नेते इंद्रभान पेरणे, सचिन काळे, सिताराम नालकर, राजू सांगळे, बाळासाहेब तारडे, नामदेव शिंदे, सुरेश तनपुरे आदींनी उपोषणाला बसणार असल्याचे ठामपणे सांगितले. कामगार नेते इंद्रभान पेरणे म्हणाले की, कामगारांचे मागील पाच वर्षात २५ कोटी ३६ लाखांची थकबाकी आहे.
मागिल उपोषणाच्यावेळी खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे थकबाकी दिली नाही. तर, सोमवार दि.23 पासून अन्नत्याग करून आमरण उपोषण सुरु करणार आहे.उपोषणा दरम्यान थाळीनाद ,जागरण गोंधळ, घंटानाद, अर्धनग्न आंदोलन, रस्ता रोको अशी विविध आंदोलने टप्प्याटप्प्याने करुन आंदोलनाची तीव्रता वाढविण्यात येईल.
कारखाना व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्या मार्फत लेखी आश्वासन दिले तरच आंदोलन मागे घेण्यात येईल.नाही तर आठ दिवसानंतर सामूहिक आत्मदहन करण्यात येईल.