अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2022 :- एमआयडीसी परिसरात दहशत निर्माण करून धुमाकूळ घालणार्या गणेश कुर्हाडे टोळीविरूध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा (मोक्का) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
जिल्हा पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर यांनी मंजुरी दिली आहे.
यामध्ये टोळीप्रमुख सीताराम उर्फ शीतल उर्फ गणेश भानुदास कुर्हाडे (वय 33 मूळ रा. चितळी ता. राहाता, हल्ली रा. वडगाव गुप्ता ता. नगर), टोळी सदस्य राहुल सुरेश जाधव (वय 21 प्रवरासंगम ता. नेवासा),
पंकज बापू गायकवाड (वय 27 रा. गोंधवणी ता. श्रीरामपूर), आकाश रामचंद्र भोकरे (वय 23 रा. कायगाव टोका ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), सागर गोरख मांजरे (रा. श्रीरामपूर),
सतीश मच्छिंद्र शिंदे (गणेश चौक, बोल्हेगाव), अमोल सटवा कापसे (रा. कॉटेज कॉर्नर, अहमदनगर), विक्की उर्फ विकास शिंदे (रा. श्रीरामपूर),
विकास अशोक जाधव (रा. पाखोरा, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) यांचा मोक्कामध्ये समावेश आहे. नागापूर एमआयडीसीतील ब्लॉक नंबर एल -26 मधील झेन इलेक्ट्रीक प्रा. लि. कंपनीवर 22 ऑक्टोंबर 2021 रोजी आरोपी गणेश कुर्हाडे याच्या टोळीने दरोडा टाकला होता.
या गुन्ह्यात मोक्का अन्वये कारवाई करण्यात आली आहे. या टोळीने एमआयडीसी, कोपरगाव, श्रीरामपूर, लोणी, तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर्या, रस्ता लूट, दरोडे टाकले आहेत.
औरंगाबाद, नाशिक या जिल्ह्यातही गुन्हे केलेले आहेत. पोलीस उपअधीक्षक अजित पाटील (नगर ग्रामीण) या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.