अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- फायनान्सच्या धाकाने तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली आहे. येथील नितीन मोतीराम भालेराव (३८ वर्ष) असे मयत तरुणाचे नाव आहे.

या घटने बाबत राहुरी पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, नितीन मोतीराम भालेराव हा तरूण रोजंदारीवर मिळेल ते काम करत होता.

नितीन एके दिवशी राहुरी कृषी विद्यापीठाच्या इ विभागाच्या प्रक्षेत्रात गेला होता. खुप उशीरा पर्यंत नितीन घरी परतला नाही. म्हणुन त्याचा नऊ वर्षाचा मुलगा आर्यन हा त्याला पाहाण्यासाठी गेला.

त्यावेळी एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह दिसून आला. ही बातमी समजताच राहुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणीसाठी राहुरी ग्रामीण रुग्णालयात पाठवून शवविच्छेदनास पाठविले. नितीन याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजले नाही.

परंतु नितीन याने अनेक फायनांस कंपनीचे कर्ज घेतले होते. लॉक डाऊनमध्ये हाताला वेळेवर काम मिळत नसल्याने कर्जाचे हप्ते वेळेवर गेले नाही. परिणामी फायनान्स कंपन्यांनी हप्ते भरण्याचा तगादा लावला होता.