अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील समर्थ पेट्रोल पंपानजीक रात्रीच्या सुमारास उभ्या केलेल्या मालवाहू ट्रकच्या इंधन टाकीतून सोमवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास ३०० लिटर डिझेलची चोरी करण्यात आली.
हा प्रकार चालक व क्लिनर झोपेतून उठल्यावर उघडकीस आला. या घटनेने तळेगाव दिघे परिसरात डिझेल चोरांची टोळी सक्रीय असल्याचे उघड आले.
संगमनेर ते कोपरगाव रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक समर्थ पेट्रोल पंप आहे. पेट्रोल पंपानजीक रात्री १.३० वाजेच्या सुमारास चालक जाफर हकीमखान (रा. सियार, मध्यप्रदेश) यांनी मालवाहू ट्रक (क्र. एमपी ०९ एचजी ९४२१) उभा केलेला होता.
त्यानंतर चालक व क्लिनर झोपले होते. पहाटे ४ वाजेच्या सुमारास स्कॉर्पिओ गाडीतून आलेल्या तिघा चोरट्यांनी मालवाहू ट्रकच्या इंधन टाकीचे झाकण तोडून ३०० लिटर डिझेल चोरून नेले.
चोरट्यांनी वापरलेली स्कॉर्पिओ गाडी पेट्रोलपंपाच्या सीसीटीव्हीत कैद झाली, मात्र गाडीचा क्रमांक दिसत नाही. चोरीची घटना घडल्यानंतर पाऊण तासातच संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या रात्रीच्या गस्ती पथकाची गाडी तेथे पोहचली,
मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. हा मालवाहू ट्रक चाकण येथून भोपाळ येथे जात होता. यापूर्वीही पेट्रोल पंपावर डिझेल चोरीच्या घटना घडलेल्या आहेत.
चोरीच्या या घटनेने तळेगाव दिघे परिसरात डिझेल चोरांची टोळी सक्रीय असल्याचे उघड झाले आहे. डिझेल चोरांच्या टोळीचा पोलिसांनी छडा लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.