अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कुकाणा येथील शामसुंदर धोंडीराम खेसे यांचे घरातून चोरट्यांनी सोन्याच्या २३ तोळे दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये असा एकूण ८ लाख ८५ हजार रुपयांचा ऐवज पळवला.
काल शुक्रवारी रात्री एक वाजेच्या सुमारास चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी उघडकीस आला. खेसे यांच्या मुलाचे रविवारी लग्न आहे. त्यामुळे त्यांच्या घरासमोर मंडप टाकलेला आहे.
चोरट्यांनी हिच संधी साधत वराच्या घरात चोरी केली. कुकाणा येथील जेऊरहैबती मार्गालगत खेसे राहतात.
ते पाटबंधारे विभागात नोकरीस आहेत. त्यांच्या मुलाचे रविवारी लग्न असल्याने वराचे अनेक नातेवाइक खेसे यांच्याकडे मुक्कामी होते.
खोसे घरात नातेवाईकांसह झोपलेले असताना तिघा चोरट्यांनी घराच्या समोरचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला व घरातील खोसे कुटुंबियांसह त्यांच्या नातेवाइकांचेही सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.
खोसे यांच्या मुलीला पहाटे जाग आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खेसे यांच्या घरी चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी लगतच्या ललित भंडारी यांचे गेट उघडण्याचा प्रयत्न केला होता.
भंडारी यांच्या सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले आहेत. त्यावरुनच तिघे चोरटे असल्याचे दिसत आहेत. याप्रकरणी खेसे यांनी नेवासा पोलिसांत फिर्याद दिली आहे.
नेवाशाचे पोलीस निरीक्षक विजय करे यांच्यासह गुन्हे अन्वेषण पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. खेसे यांच्या घरी लग्न समारंभ असल्याने सर्व नातेवाइक घरातच गाढ झोपेत असतानाच चोरी झाली.