…तर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :-  प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत सात कोटी लाभार्थ्यांसाठी प्रतिमाह साडेतीन लाख मेट्रिक टन धान्य उपलब्ध झाले आहे.

सर्व जिल्ह्यातील पुरवठा विभागाला धान्याची उचल करून वाटप करण्याचे आदेश अन्न, नागरी पुरवठा विभागाने दिले असून प्रत्येक लाभार्थ्याला पाच किलो म्हणजे एका कुटुंबात किमान ३५ किलो धान्य मोफत मिळणार आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकट अजूनही कायम आहे. त्यामुळे गरिबांना कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. त्यांना आधार देण्यासाठी हि योजना राबवण्यात येत आहे. केंद्राने २४ जून २०२१ च्या आदेशान्वये सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी आणखी पाच महिने म्हणजे दिवाळीपर्यंत गरिबांसाठी मोफत धान्य देण्याचा आदेश दिला आहे.

जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या नियमित धान्याव्यतिरिक्त हे धान्य वाटप केले जाणार आहे. त्यानुसार प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारक आणि अंत्योदय योजनेतील कार्डधारकांना प्रतिमाह पाच किलो धान्य मोफत दिले जाणार आहे.

जुलै महिन्यासाठीच्या धान्य वाटप करण्यासाठी संबंधित जिल्ह्यांनी ३१ जुलैच्या आत धान्याची उचल करायची आहे. धान्याची उचल न केल्यास जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ज्या जिल्ह्यांकडे याआधीचे धान्य शिल्लक आहे, त्या जिल्ह्यांनी जुलै महिन्याचे वाटप करण्याचा आदेश दिला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24