अहमदनगर Live24 टीम, 19 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या गंभीर संकटात कोणतेही राजकारण न करता, या संकटातून सर्व जनतेला बाहेर काढायचे आहे. मात्र राज्य सरकारला व प्रशासनाला या परिस्थितीचे गांभीर्य राहिलेले नाही.
सर्व उपाययोजना कमी पडत आहेत. नगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार माजलेला असून, देशातील जास्त रुग्णसंख्या असलेल्या टॉप टेन जिल्ह्यात नगरचा समावेश झाला आहे.
राज्य सरकारचा निष्काळजीपणा, चुकीचे धोरण व जिल्हा प्रशासनाचा नियोजन शून्य व ढिसाळ कारभारा मुळे जिल्ह्यातील परिस्थिती प्रशासनाच्या हात बाहेर गेली आहे.
भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी ठामपणे उभी असून, जोपर्यंत होत असलेला सर्वप्रकारचा काळाबाजार थांबून रुग्णांना सर्व सुविधा तातडीने मिळणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही.
आज अत्यंत सौम्य भूमिका घेत व कसलेही राजकारण न करता पालकमंत्र्यांना याबाबतच्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. कोरोनाच्या नियंत्रणासाठी जर तातडीने चांगल्या उपाययोजना राबवल्या नाहीतर भाजप पालकमंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही,
असा इशारा भाजपचे माजी शहराध्यक्ष वसंत लोढा यांनी दिला. शहर भाजपच्या वतीने पालकमंत्री हसन मूश्रीफ यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.
यात नमूद केले आहे की, जिल्ह्यात रेमडीसिव्हचा काळा बाजार राजरोसपणे सुरु आहे. सामान्य नागरिकांना रेमडीसिव्हर व बेड मिळत नाहीत, यामुळे अनेक जणांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे.
बेड व रेमडीसिव्हर, आक्सिजन मिळत नसल्याने नागरिकांना आपल्या कुटुंबियांचे मरण डोळ्यासमोर पहावे लागत असून अनेक रुग्णांचे नातेवाईक बेड व रेमडीसिव्हर, ऑक्सिजनसाठी दिवस रात्र फिरत आहेत.
या संकट काळात काहीजण परिस्थीचा गैरफायदा घेत नागरीकांची लुट करत माणुसकीला काळिमा फासत आहेत.
यात मोठ्याप्रमाणात सर्वसामान्य, गरीब नागरिक अक्षरशः भरडला जात आहे. तसेच यासर्व गोष्टीसाठी नागरिकांची राजरोसपणे लुट सुरू आहे.
या सर्व गोष्टींना राज्य सरकारचे चुकीचे धोरण व जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा व ढिसाळ कारभार कारणीभूत ठरत आहे. तातडीने यात सुधारणा झाली नाहीतर भाजप शांत बसणार नाही.