…तर हा संभाजी महाराज तुम्हाला आडवा येईल’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्याला हा संभाजी महाराज आडवा येईल. अजून मी आक्रमक झालेलो नाही, त्यासाठी दोन मिनिटं लागतात, पण हे मला सिद्ध करण्याची गरज नाही, असा इशारा भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिला.

मराठा आरक्षणाबाबत ते नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. २७ तारखेला मराठा आरक्षणावर आपण भूमिका मांडणार असून त्यानंतर कोणी माघार घेतली तर बघाच असा इशारा आमदार आणि खासदारांना दिला आहे.

यावेळी त्यांनी पक्षाला घरचा अहेर देत तोडगा सांगा, मराठा समाजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो यावर बोला असं आवाहन करत मी काही भाजपाचा ठेका घेतलेला नाही अशा शब्दांत सुनावलं आहे भाजपाने आंदोलनात सहभागी होण्याची भूमिका घेतली आहे,

यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “त्यांची भूमिका त्यांनी बघावी. मी काय त्यासाठी ठेका घेतलेला नाही. तोडगा काय आणि मराठा समजाला न्याय कसा मिळवून देऊ शकतो यासंबंधी बोला”.

मागच्या सरकारने बोगस कायदा केला की आताच्या सरकारने योग्य मांडणी केली नाही याच्याशी आम्हाला काही करायचं नाही असंही ते म्हणाले. मी छत्रपती शिवाजी महाजारांची, राजर्षी शाहू महाराजांची आणि समाजाची भूमिका मांडत असतो.

सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर गेल्या काही दिवसात राज्य आणि केंद्रात आरोप प्रत्योराप सुरु असून एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. कोणी ही राज्याची जबाबदारी तर कोणी केंद्राची जबाबदारी असल्याचं म्हणत आहे.

मराठा समाजाला याच्याशी काही देणं घेणं नसून तुम्ही मार्ग काय काढून देणार आहात ते सांगा, अशी विचारणा छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. मी समंजसपणाने भूमिका घेतली होती, त्याच्यावर शंका घेण्यात आली. माणसं जगली तर आऱक्षणासाठी लढू शकतो.

छत्रपती घराण्याचा वंशज म्हणून मला कोणी आंदोलन कसं करायचं हे शिकवण्याची गरज नाही. मी जे बोलतो ते करुन दाखवतो. एकदा पाय टाकला तर माघार नाही आणि मी हे करुन दाखवलं आहे. २००७ पासून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे.

एवढा मोठा अलिशान वाडा असतानाही महिन्यातील चारच दिवस तिथे राहतो. समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी, दिशा देण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढला आहे.

म्हणून मला कोणी शिकवण्याची गरज नाही,” असंही ते म्हणाले आहेत. २७ तारखेला मराठा समाज काय करणार हे सर्वांना कळेल. पण तोपर्यंत मराठा समाजाने शांत राहावं. आपला जीव धोक्यात घालू नका असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.

अहमदनगर लाईव्ह 24