अहमदनगर Live24 टीम, 11 जुलै 2021 :- विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली.
या अधिवेशनात भाजपाच्या 12 आमदारांचे निलंबन झाल्यामुळे सर्वत्र जाधवांच्या नावाची चर्चा सुरू झाली. यातच विधानसभा अध्यक्षपदावरून पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडून घेण्यात यावे अशी मागणी शिवसेनेत होत आहे.
तर जाधव यांनी याला दुजोरा देत अध्यक्षपद स्वीकारण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे. यावर आता काँग्रेसच माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देत विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेत देवाणघेवाणीची प्राथमिक चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि ऊर्जामंत्री नितीन राऊत
यांनी शुक्रवारी थेट दिल्ली गाठून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत याबाबत चर्चा केल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्षपद सोडून उपमुख्यमंत्रिपदाबाबत रस दाखवल्याचे कळते.
त्यासाठी शिवसेनेला विधानसभा अध्यक्षपद आणि काँग्रेसला उपमुख्यमंत्रिपद असा एक फॉर्म्युला दोन्ही पक्षाच्या विचाराधीन आहे. असे झाल्यास, राज्याला दोन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
तथापि, काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतच्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.