गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराच्या शंभरहून अधिक घटना घडल्या

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र राज्य हादरुन चालले आहे. मुंबईतील साकीनाका इथल्या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या वाढत्या घटनांमुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे.

यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील या घटनांची मोठी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराच्या १२७, विनयभंग ३१३ तर अपहरणाच्या १८४ घटना समोर आल्या आहेत.

बलात्काराच्या १२७ पैकी तब्बल ६५ घटना अल्पवयीन मुलींबाबत घडल्या आहेत. या आकडेवारीतून एकच स्पष्ट होते ते म्हणजे कायदे कितीही सक्षम असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. घराबाहेर गेेलेली एकटी महिला सुरक्षित नाही, तशी घरात थांबणारी महिलाही सुरक्षित नाही.

कारण अनेक घटनांमध्ये घरातील अथवा जवळच्या व्यक्तींनीच महिला, अल्पवयीन मुलींना आपल्या वासनेची शिकार बनविल्याचे समोर आले आहे. अनेक घटनांमध्ये ओळखीचा व्यक्ती, घरातील नातेवाईक, अथवा लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार झालेला आहे.

मैत्री झाल्यानंतर संधी साधून अश्लिल फोटो व व्हिडीओ काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करूनही तरुणीवर अत्याचार केल्याचे प्रकार नगर शहरात समोर आले आहेत.

Ahmednagarlive24 Office