अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:- कर्जत तालुक्यातील राशीन येथील नामांकीत डॉ.महेंद्र थोरात त्यांची पत्नी, दोन मुले हे शनिवारी आपल्या राहत्या घरात मृतअवस्थेत आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.
राशीन येथील डॉ.महेंद्र जालिंदर थोरात (वय ४७) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला असल्याचे उघड झाले, तर त्याची पत्नी वर्षा महेंद्र थोरात (वय ४१) यांच्यासह दोन मुले कृष्णा (वय १६) व कैवल्य (वय ६) हे तिघेही घरात मृतअवस्थेत आढळले.
शनिवार दि.२० रोजी सकाळी डॉक्टरांना अनेक फोन करूनही त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लोक त्यांच्या घरी पोहचले. दार वाजवले मात्र तरीही दार न उघडल्याने शेवटी पोलिसांना बोलावून दार तोडून घरात प्रवेश केला असता अत्यंत धक्कादायक चित्र समोर आले.
याबाबतची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोलीस उप निरीक्षक सोमनाथ दिवटे यांनी भेट देऊन पाहणी केली. ही घटना कळताच अनेकांनी डॉ.थोरात यांच्या श्रीराम हॉस्पिटलकडे धाव घेतली. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून, वैद्यकीय क्षेत्रामुळे सर्वांच्या संपर्कात असलेल्या डॉ.थोरात यांनी असे का केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.
डॉ.थोरात हे अत्यंत मितभाषी होते प्रत्येकाला मदत करणारे, अडचणीतील व्यक्तींना आधार देणारे, प्रत्येक व्यक्तीला मोटिव्हेट करणाऱ्या व्यक्तीने असा निर्णय का घेतला असे न सुटणारे कोडे आहे.
या घटने बाबत राशीन येथील नवीन रसिकलाल बोरा यांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये खबर दिली असून त्यात म्हटले आहे की, हॉस्पिटलच्या खाली असलेल्या मेडिकलवाले निलेश मुथ्था यांचा सकाळी सव्वादहा फोन आला ते म्हणाले डॉक्टर सकाळपासून दार उघडत नाहीत.
दरम्यान महादेव जगताप यांचाही निरोप आला. आम्ही इतर लोकांसह सर्वजण धावत डॉक्टर थोरात यांच्याघराकडे गेलो. दार उघडले नाही म्हणून मग दार तोडून आत गेलो असता एका खोलीत डॉक्टर लटकलेल्या अवस्थेत आढळले.
आम्ही त्वरित ही बाब पोलिसांना कळवली. दरम्यान पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे व इतर पोलिस या ठिकाणी आले. त्यांनी स्लॅबच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेतल्याचे लक्षात आले. सदर खोलीत लहान मुलगा पलंगावर होता तर ते मॅडम व मोठा मुलगा खाली झोपलेल्या अवस्थेत होते. याठिकाणी खोलीच्या दरवाजाला पांढरी चिकटपट्टी लावलेली एक चिठ्ठी ही पहावयास मिळाली. पोलिसांनी सांगितले नंतर आम्ही डॉ.थोरात यांचे शरीर खाली घेतले.