अहमदनगर Live24 टीम, 23 ऑगस्ट 2021 :- आता नगरची जिल्हा परिषद फक्त विकायची बाकी असुन ती दहा टक्क्यांची दुकानदारी झाली आहे. प्रत्येक कामासाठी टक्केवारी चालते. त्यांच्या निधीतून सध्या झालेली कामे पहा. त्यांची अवस्था पहा. किती खायचं याचे लिमीटच राहिलेले नाही.
ऊस गोड लागला म्हणून मुळासकट माती ही खाली जात आहे अशी टिका खासदार डॉ. सुजय विखे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली. नगर तालुक्यातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी डॉ .विखे म्हणाले की, इतके वर्ष राजकारण पाहतो पण आघाडी सरकार आल्यापासुन प्रथमच डीपी चे उदघाटन करायला मंत्री येतात.१० लाखांच्या कामासाठी १० तास भाषणे ठोकतात. महाविकास आघाडी सरकारने गेल्या दोन वर्षात ज्या कामांचे भूमिपुजने केली ती फडणवीस सरकारच्या काळात मंजुर झालेली आहेत.
याचा हिशेब घेऊनच आम्ही आगामी निवडणुकींच्या मैदानात उतरणार आहोत. दुसऱ्यांची कामे आपल्या नावावर खपवण्याचे बोगस धंदे आम्ही कधीच केले नाहीत.
जाहिरातबाजी, शोबाजी करण्यात आम्ही कमी पडतो. रेमडेसेविर इंजेक्शनचा साधा फोटो काढला तरी आमच्या वाट्याला कोर्टबाजी आली.मात्र नगर जिल्हयाचे राजकारण जाहिरातबाजीवर चालत नाही त्यासाठी काम करावे लागते. असा टोला देखील त्यांनी लगावला.