कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असलेली ‘सुई’ चा भासतोय तुटवडा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम युद्धपातळीवर सुरु आहे. यामुळे कोरोनाबाधितांची संख्या घटू लागली असून नव्याने होणाऱ्या बाधितांच्या संख्येत घट होत आहे.

मात्र जिल्ह्यात सुरु असलेल्या लसीकरणामध्ये एका बाधा निर्माण झाली आहे.कोरोना लसीकरणासाठी आवश्यक असणाऱ्या एडी सीरिंजचा तुटवडा निर्माण झाल्याने सध्या लसीकरणासाठी २ सीसी किंवा इतर सीरिंज (सुई) वापरली जात आहे.

कोरोना लसीकरणासाठी एडी सीरिंजचा वापर केला जातो. एडी म्हणजे ॲटो डिसेबल. कोरोनाच्या लसीच्या कुपीतून ५ मिली द्रावण ओढल्यानंतर ही सीरिंज ऑटो लाॅक होते.

म्हणजे सुईत सारखा डोस ओढला जातो. परंतु गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून एडी सीरिंजचा तुटवडा असल्याने केंद्र शासनाकडून या सीरिंजचा पुरवठा बंद झाला आहे.

त्यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध असणाऱ्या २ सीसी किंवा इतर सीरिंज वापरण्याबाबत केंद्राने कळवले आहे. कोरोना लसीकरणासाठी केंद्र शासनाकडून एडी सीरिंजचा पुरवठा कमी झाल्याने बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी २ सीसी सीरिंज वापरण्यात येत आहे.

या सीरिंजमध्ये द्रावण घेतल्यानंतर त्यातील एअर काढण्यासाठी काही द्रावण वाया जाते. त्यामुळे लसीचे वेस्टेज वाढण्याची शक्यता आहे. ही सुई काही जाडही असते.

इतर सीरिंज वापरण्यात काही गैर नाही. परंतु यात एक अडचण अशी आहे की, द्रावण ओढताना कर्मचाऱ्यांना ते नीट पाहून ५ मिलीच घेतले आहे का, ते प्रत्येक वेळी काळजीपूर्वक पाहावे लागणार आहे. अन्यथा डोसचे प्रमाण कमी-अधिक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एडी सीरिंजमध्ये ही अडचण नव्हती.

Ahmednagarlive24 Office