कोणत्याही क्षणी महापौर निवडणूक होणार ! दहा दिवसांत निर्णय घ्यावा लागणार …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-अहमदनगर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी नगरचे राजकारण चांगलेच तापले आहे.

विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत 30 जूनला संपत असल्याने कोणत्याही क्षणी महापौर-उपमहापौरपदाच्या निवडणुकीची तारीख जाहीर होवू शकते, महापौर पदाच्या निवडणुकासाठी येत्या काही दिवसांत निर्णय घ्यावा लागणार आहे.

राखीव प्रवर्गातील उमेदवारच नसल्याने भाजप या निवडणुकीतून बाहेर पडल्याने शिवसेना व राष्ट्रवादीला एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडे शिवसेना व भाजप पुन्हा एकत्र येण्याचा पर्यायही खुला झाला आहे.

अहमदनगरमध्ये सध्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपचा महापौर आहे. सर्वाधिक जागा असूनही शिवसेना सत्तेपासून दूर आहे. विद्यमान महापौर बाबासाहेब वाकळे यांची मुदत ३० जून रोजी संपत आहे.

त्यापूर्वी ही निवडणूक घ्यावी लागणार आहे. अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी पुढील महापौरपद राखीव झाले आहे. या प्रवर्गातील उमेदवार भाजपकडे नाही. त्यामुळे भाजप या स्पर्धेतून बाहेर पडला.

कमी जागा असून काँग्रेसने सर्वांत आधी उमेदवार जाहीर करून या पदावर दावा ठोकला. राष्ट्रवादीने या निवडणुकीबद्दल अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेकडे रोहिणी शेंडगे व रिता भाकरे या दोन उमेदवार असून

त्यातील रिता भाकरे यांनी उमेदवारीतून माघारी घेतली आहे. भाजप या निवडणुकीत तटस्थ राहणार असल्याचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष भय्या गंधे यांनी जाहीर केले आहे.

महापालिकेत शिवसेना 23, राष्ट्रवादी 19, भाजप 15, काँग्रेस 5, बसपा 4, सपा 1 असे पक्षीय बलाबल आहे. एक जागा रिक्त आहे. या महापौर निवडणुकीत आ. संग्राम जगताप कोणती खेळी खेळतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

राष्ट्रवादीकडे उमेदवार नाही. या निवडणुकीबद्दल त्यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. सर्व अधिकार आमदार जगताप यांच्याकडे आहेत. त्यांनी अद्याप उमेदवार जाहीर केला नाही आणि कोणासोबत युती करणार हेही जाहीर केले नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24