जिल्ह्यात दररोज जवळपास 30 हजार कोरोना तपासण्या होणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अत्यंत झपाट्याने वाढू लागला आहे. काही दिवसांपूर्वी कमी होत असलेली आकडेवारी गेल्या काही दिवसांपासून अत्यंत वेगाने वाढत आहे.

यामुळे पुन्हा एकदा प्रशासनाने कंबर कसली आहे. कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी एका कोरोनाबाधिताच्या संपर्कातील किमान ३० जणांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

याबाबत आरोग्य यंत्रणेला नियोजन करण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळे रोज १५ ते १६ हजार चाचण्या व्हायच्या, ही संख्या आता ३० हजारांपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अहमदनगर जिल्ह्यात ही संख्या कमी होत नाही. त्यामुळे राज्यात कोरोनाची महामारी पुन्हा सुरू झाली तर ती अहमदनगर जिल्ह्यातून सुरू होईल, असा इशारा विभागीय आयुक्त गमे यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात दिला होता.

तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत गमे यांनी यंत्रणेतील अधिकाऱ्यांनाही चांगलेच फैलावर घेतले होते. त्यामुळे जिल्ह्यातील यंत्रणा अधिक सतर्क झाली होती.

गमे यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी यांनी आरोग्य यंत्रणेला पुन्हा एकदा चाचण्यांची संख्या वाढविण्याचा आदेश दिला आहे. एका बाधिताच्या संपर्कातील ३० जणांची चाचणी करणे, रोज जिल्ह्यात ३० हजार चाचण्या अपेक्षित आहेत, असे नियोजन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.

कोरोनाची लक्षणे असणाऱ्यांनी त्वरित आरटीपीसीआर चाचणी करून घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.