अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे.
कुठे प्राणवायू नाही, कुठे औषधे नाहीत, कुठे बेडस् नाहीत. त्याअभावी रुग्णांचे हाल व मृत्यू होत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी कडक निर्बंध लागू करूनही रुग्णसंख्या वाढतच असल्याने राज्य सरकारने संपूर्ण लॉकडाउन करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यासंदर्भातील घोषणा करणार असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते. दरम्यान, लॉकडाउन किती दिवसांचा जाहीर करायचा, कोणत्या अत्यावश्यक सेवा सुरू ठेवायच्या, सार्वजनिक वाहतुकीबाबत काय करायचे,
गेल्या वर्षीप्रमाणे जिल्हाबंदी लागू करायची किंवा कसे याबाबत चर्चा होऊन मार्गदर्शक सूचना जारी होणार आहेत. यामुळे राज्यात लॉकडाउनबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झालेला आहे. लॉकडाउनबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबतची माहिती देतील.
जिल्हाबंदी होणार नाही, पण विनाकारण फिरणाऱ्यांना रोखले जाईल, अशी माहिती महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सध्या ६ लाख ८५ हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी १५ टक्के लोकांना ऑक्सिजनची गरज भासू शकते.
आतापर्यंत आपल्याकडे १ हजार ५५० मेट्रिक टन ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे. भारत सरकार ऑक्सिजनची आयात करेल, याची अपेक्षा आम्ही करत आहोत, असे टोपे म्हणाले.
डॉक्टरांनी ऑक्सिजन आणि रॅमडेसिव्हिरचा वापर योग्य प्रकारे करावा. सध्या महाराष्ट्रात १ हजार २५० टन द्रव ऑक्सिजन तयार होत आहे, आणि त्याचा पूर्णपणे वापर फक्त वैद्यकीय कारणासाठी केला जाईल, असेही टोपे यांनी सांगितले.