अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढल्याने बाधितांच्या संपर्कात आलेल्या २० जणांचा शोध घेऊन तत्काळ चाचण्या कराव्यात, लग्नसमारंभात गर्दी टाळून फक्त पन्नास जणांनाच मुभा द्यावी,
ज्या भागात अधिक रुग्ण आढळत आहेत, तेथे तत्काळ प्रतिबंधात्मक आदेश जारी करून उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरूवारी दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेऊन जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून कोरोनाचा आढावा घेत योग्य ती खबरदारी घेत उपाययोजना करण्याचे आदेश दिले.
जिल्हाधिकारी भोसले यांनी आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण विभागाची बैठक घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. महापालिका, नगरपालिका व तहसील स्तरावर सध्या बाधित असलेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेले हाय रिस्क २० जणांचे शोध घेऊन त्यांच्या तत्काळ चाचण्या करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील डॉक्टरांना नियमित आढावा घेऊन त्यांच्याकडे तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांची (विशेषतः फ्लू) माहिती ठेवण्याचे सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्ण वाढत असल्यास त्या भागातील लोकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून आवश्यकता भासल्यास कंटेनमेंट झोन जारी करण्याचे आदेश दिले आहेत.