अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ मुलींनी दिला वडिलांच्या पार्थिवाला अग्निडाग !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- श्रीरामपूर येथे वास्तव्यास असलेल्या ज्ञानेश्वर माधवराव कांगुणे ( वय ७२) यांचे गुरुवार दि.१३ मे रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.

कांगुणे यांना मुलगा नसल्याने त्यांच्या तिनही मुलींनी त्यांना अग्निडाग दिला व अंत्यविधीचे सोपस्कार पार पाडले. कांगुणे यांच्या लेकींनी परंपरेच्या भिंती तोडत मुली पण वंशाचा दिवाच असतात हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.

कांगुणे हे सोमैय्या ऑरगॅनिक केमिकल्स येथे ४० वर्षे नौकरी करुन एच.आर.मॅनेजर म्हणून निवृत्त झाले होते. ते मुळचे बेलपिंपळगाव (ता. नेवासा) येथील रहिवासी. निवृत्तीनंतर ते श्रीरामपूर येथे स्थायिक झाले होते.

गेल्या महिन्यात त्यांची प्रकृती बिघडली. दवाखान्यात उपचार घेवून ते आठ दिवसांपूर्वी ते घरी परतले. पण गुरुवारी रात्री पुन्हा त्यांची तब्येत बिघडली. श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने पहाटे साडे पाच वाजता त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, एक भाऊ, तीन बहिणी, तीन मुली, जावई, पुतणे,

नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी मुलगा मुलगी असा भेद न मानता तिन्ही मुलींना शिकवले. वडिलांनी केलेल्या संस्काराला जागत त्यांच्या निधनानंतर तिन्ही मुलींनी त्यांच्या अंत्यसंस्काराचे विधी स्वतः करण्याचे ठरवले.

कांगुण यांचे भाऊ पत्रकार सुरेश कांगुणे, जावई विलास पवार, रोहित जगताप, पुण्यनगरी उपसंपादक समीर दाणी, पुतण्या अक्षय, कुटुंबातील सदस्य व नातलग तसेच ते राहत असलेल्या साईवेध अपार्टमेंट मधील रहिवाशांनी या निर्णयाला पाठिंबा दिला.

लहान मुलगी अपेक्षा दाणी हिने पाणी पाजले व अग्निडाग दिला. तर मोठी मुलगी आश्लेषा पवार व अर्चना जगताप यांनी बाकीचे विधी पार पाडले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24