अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- महिला सबलीकरण, सामाजिक स्थिती, संसदेतील उपस्थिती आणि सहभाग अशा विविध 10 निकषांवर देभभरात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत रवी राणा यांचा 25 श्रेष्ठ खासदारांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
फेम इंडिया आणि आशिया पोस्ट सर्वेक्षणात विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या 25 महिलांची यादी जाहीर केली आहे. राजकारणाआधी नवनीत राणा यांनी सिनेसृष्टीतही काम केलं आहे.
अभिनेत्री म्हणून त्यांनी दाक्षिणात्य सिनेमात भूमिका साकारल्या आहेत. तेलुगु, तामिळ, मल्याळम, कन्नडासह हिंदी आणि पंजाबी सिनेमातही त्यांनी काम केले आहे..
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा या अपक्ष लढल्या. राष्ट्रवादीचा त्यांना पाठिंबा होता. मात्र विजयानंतर नवनीत राणा यांनी ठाकरे सरकारविरुद्ध भूमिका मांडल्या आहेत.
तर केंद्रातील मोदी सरकारच्या धोरणांचं कौतुकही करताना त्या दिसतात. त्यामुळे त्या वादातही सापडतात. 2014 मध्येही नवनीत राणा लोकसभा निवडणूक लढल्या, मात्र त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.
मुंबईत राहणाऱ्या नवनीत राणा लग्नानंतर आपले पती रवी राणा यांच्यासोबत अमरावतीत राहू लागल्या आणि पुढे जाऊन त्यांनी त्याच मतदारसंघाचं नेतृत्व करायला सुरूवात केली.
राणा यांच्या खासदारकीला जेमतेम 18 महिने पूर्ण झाले आहेत. मात्र या कालावधीत संसदेत झालेल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये त्यांचा सहभाग होता.महिलांसह महाराष्ट्राचे मुद्दे मांडणाऱ्या महाराष्ट्राच्या खासदारांमध्ये नवनीत राणा यांचा उल्लेखनीय सहभाग असतो.
महाराष्ट्रातील महिला खासदारांचा विचार केला तर लोकसभेत सुप्रिया सुळे आणि नवनीत राणा आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसतात. राजकारणात प्रवेश केल्यानंतर अल्पावधीतच नवनीत राणा लोकांमध्ये लोकप्रिय झाल्या.