ताज्या बातम्या

चोरांनी देखील कमालच केली: चालत्या ट्रकमधून चोरले चक्क दीड लाखाचे तुप…? ‘या’महामार्गावर घडली घटना

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : दिवसेंदिवस चोरटे देखील नवीन शक्कल लढवत चोरी करत आहेत. त्यामुळे अनेकदा पोलिस देखील हतबल होत आहेत.

नुकतीच चालत्या ट्रकमधून ताडपत्री कापून चक्क दिड लाख रुपयाचे तूप चोरी केल्याची घटना नगर-दौंड महामार्गावरील श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात घडली आहे.

या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा जिल्ह्यातील फलटण येथून कुटे सन्स कंपनीचा एक ट्रक (एम.एच.२३ ए.क्यू.३२०९) तुपाचे खोके घेऊन हरियाणाच्या दिशेने निघाला.

त्यानंतर हा ट्रक गंगापूर येथील कंपनीत आणखी काही डबे भरण्यासाठी थांबला असता, मागिल बाजूने या ट्रकची ताडपत्री फाडलेली असल्याचे येथील कर्मचाऱ्यांना दिसून आले.

त्यावेळी गाडीतील तुपाचे खोके मोजले असता त्यामध्ये २१ खोके कमी भरले. मात्र ट्रक कुठेही उभा राहिला नसल्याने चोरी कधी झाली असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात येऊन पाहणी केली असता तेथे तीन डबे पडल्याचे आढळून आले.

त्यावेळी लोणी व्यंकनाथ शिवारात रस्ता खराब असल्याचा फायदा घेत चोरट्यांनी हात साफ केल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी कुटे सन्स कंपनीचे वाहतूक व्यवस्थापक अनिल सुनील होळकर (रा.फलटण, जि. सातारा) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office