अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- श्रीगोंदा येथील रहिवाशी असलेली महिला दुचाकीवरून घरी जात असताना कर्जत तालुक्यातील जलालपूर शिवारात सदर महिलेला चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्यास कर्जत पोलिसांनी जेरबंद केले आहे.
गेल्या आठवड्यात सायंकाळच्या वेळी एक महिला आपल्या मुलासोबत श्रीगोंदा येथून भांबोरा येथे तिच्या बहिणीच्या घरी मोटरसायकलवर जात असताना कर्जत तालुक्यातील जलालपूर शिवारात सटवाई वस्तीजवळ रस्त्यात पाऊस लागल्याने एका बाभळीच्या झाडाखाली आडोशाला थांबले होते.
त्या ठिकाणी मोटरसायकलवर अज्ञात २० ते २५ वर्षाचे दोन इसम आले. त्यांनी चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील ३० हजार रूपये किमतीचे साडेसात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओढून घेउन निघून गेले.
याबाबत पोलीस स्टेशन तक्रार दाखल होताच कर्जत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला.
कर्जत पोलिसांना त्या परिसरातील गुन्हेगार व वर्णनावरून आरोपीचा शोध घेत असताना बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा राजु रमेश चव्हाण याने केला आहे.
त्यानुसार पहाटे जलालपूर शिवारात कोंबींग ऑपरेशन करुण आरोपी राजु रमेश चव्हाण( वय २१ वर्ष, रा. जलालपूर, ता. कर्जत) यास पकडले असून त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
सदर आरोपी कडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षीक सुरेश माने,
पोलीस अंमलदार अंकुश ढवळे, पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, गणेश ठोंबरे, सागर म्हेत्रे, चालक शकील बेग यांनी ही कारवाई केली.