अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2021:- आजच्या स्थितीला नगर जिल्हा एक चोरट्यांचा अड्डा बनला आहे. पोलिसांचा कोणताच धाक आता या चोरट्यांमध्ये उरलेला नाही आहे. चोरीच्या घटना घडणार व पोलिसात केवळ गुन्हे दाखल होणार हे नित्याचेच झाले आहे.
मात्र दरदिवशी जिल्ह्यात एवढ्या चोऱ्या घडत असताना पोलीस यंत्रणा नेमकी करते काय आता हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. नुकतेच शेवगाव तालुक्यातील शिंगोरी येथे चोरट्यांनी चार ठिकाणी घरफोडी करून रोख रक्कम, सोन्याचे दागिने, शेळ्या लंपास केल्याची घटना रविवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली.
तसेच चोरट्यांनी एका वृद्ध पती पत्नीवर चाकूने हल्ला केला, काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामध्ये हे दाम्पत्य जखमी झाले आहे. शिगोरी येथील आबासाहेब यशवंत खंडागळे वय ६० व आबासाहेब खंडागळे वय ५५ हे पती पत्नी रात्रीच्या सुमारास घरात झोपले असता रविवारी अडीच वाजेच्या सुमारास आबा दार उघडा आम्हाला तहान लागली अशी हाक मारली.
यावेळी पती पत्नीस जाग आली. त्यावेळी खिडकीतून डोकावत बाहेर पाणी आहे ते प्या असे सांगितले. त्यावेळी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला. आबासाहेब यांना चोरटे असल्याचा अंदाज आल्याने प्रतिकार करण्यासाठी साहित्य पाहू लागले. तेवढ्यात दरवाजा उघडला यावेळी चार पाच चोरट्यांनी घरात घुसून आबासाहेब यांच्यावर वार केले.
या हल्ल्यात ते जखमी झाले. ते चोरट्यांच्या तावडीतून सुटून पळाल्याने बचावले. पत्नीला देखील लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व गळ्यातील १ तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. घरात आरडाओरडा होताच घरातील ७ हजार ५०० रुपये घेऊन तेथून त्यांनी पळ काढला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.