अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-पारनेर तालुक्यातील कान्हूरपठार येथील सेवानिवृत्त प्राचार्यांच्या बंगल्यातून अज्ञात चोरट्यांनी साडेअकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागीने व बाराशे रुपये रोख रक्कम असा ३ लाख ४९ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रयत शिक्षण संस्थेतून सेवानिवृत्त झालेले प्राचार्य सखाराम कोंडाजी ठुबे यांचा कान्हूरपठार येथे बंगला असून रविवारी पहाटे ते कुटुंबियांसह घरात झोपलेले असताना
अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या लोखंडी दरवाजाची कडी उघडून सागाच्या दरवाजाची कडी तोडून घरात प्रवेश केला व घरातील सामानाची उचकापाचक केली.
लाकडी कपाटातील साडेअकरा तोळे वजनाचे सोन्याचे दागीने तसेच ठुबे यांच्या पॅन्टच्या खिशातील पाकीटातून बाराशे रुपयांची रोकड असा ३ लाख ४९ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
यावेळी ठुबे यांच्या पत्नी आशालता ठुबे यांना जाग आली. हे लक्षात येताच चोरट्यांनी तेथून पळ काढला. या चोरीची माहिती पारनेर पोलिसांना देण्यात आली.
त्यानंतर साहायक पोलिस निरीक्षक वाघ हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी ठुबे यांच्या फिर्यादीवरुन पारनेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.