अहमदनगर Live24 टीम, 7 सप्टेंबर 2021 :- देवळाली प्रवरा येथील सोसायटी नाक्याजवळील राजेंद्र सुखदेव उंडे यांचे किराणा दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडून सुमारे ६८ हजार रुपयांपेक्षा जास्त किराणा साहित्य व रोख रक्कम ऐवज चोरून नेला आहे. देवळाली प्रवरातून चोरट्यांनी नव्याने आलेले पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांना चोरी करून सलामी ठोकली आहे.
सोमवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी श्रीरामपूर रस्त्यावरील राजेंद्र उंडे यांचे ओम साई किराणा दुकानाच्या पाठीमागच्या बाजूने पत्रा उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील चहा पावडर, शेंगदाणे कट्टे, विविध प्रकारचे साबण बॉक्स, गावरान तूप, तेलाचे बॉक्स, मसाले पदार्थ, एलईडी ब्लब व इतर साहित्य पाठीमागच्या बाजूने काढून सर्व साहित्य भाजपचे प्रांत सदस्य आसाराम ढुस यांच्या उसाच्या शेतातून देवळाली प्रवरा ते चिंचोली फाटा या रस्त्यालगत नेण्यात आले आहे.
ही चोरी रात्री २ ते ३ दरम्यान भर पावसात केली आहे. देवळाली प्रवरा चौकीतील पोलिसांनी संशयित म्हणून ४ ठिकाणी घर झडत्या घेतल्या परंतु हाती काही लागले नाही. दरम्यान नगर येथील ठसेतज्ञ पथक घटनास्थळी दाखल झाले असता किराणा दुकानातील विविध साहित्यावरील ठसे तपासणी पथकाने केली.
भर पावसात व चीखलातून किराणा साहित्य चोरट्यांनी वाहून नेले असल्याने ४ ते ५ चोरटे असावेत असा अंदाज बांधला जात आहे. चोरट्यानी किराणा साहित्य गोण्यामध्ये भरून नेत असताना उसाच्या शेतात २ ते ३ गोण्या आढळून आल्या आहेत.
राहुरी पोलीस ठाण्यात राजेंद्र सुखदेव उंडे यांच्या फिर्यादिवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून 68हजार 700 रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे. घटनास्थळी पोलीस नाईक जानकिराम खेमनर, शशिकांत वाघमारे, सागर माळी आदींनी भेट दिली आहे.