अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- सध्या एकीकडे कोरोना अन दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ अशा दुहेरी संकटात सर्वसामान्य नागरिक सापडले आहेत. कोरोनामुळे पोलिसांना आधीच जास्त काम पडलेलं आहे.
त्यामुळे चोरटयांनी हीच संधी साधून चोऱ्या करत आहेत. अनेक ठिकाणी तर चक्क भरदुपारी घरफोड्या केल्याच्या घटना घडल्या आहेत.
संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे अज्ञात चोरट्यांनी तर रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने चक्क एटीएमच कट केले व १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केले.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे येथे टाटा इंडिकॅशचे एटीएम आहे.
रात्रीच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने सदर एटीएम अज्ञात चोरट्यांनी फोडले. यावेळी चोरट्यांनी सीसीटीव्हीची केबल तोडून टाकली. या एटीएममधून १ लाख ७२ हजार ५०० रुपये रोकड लंपास केली.
विजय केशव थेटे (रा. कोल्हार बुद्रुक, ता. राहाता) यांच्या अखत्यारीत हे एटीएम असल्याने शनिवारी सकाळी त्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला.
त्यानंतर थेटे यांनी पोलिसांना माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सातव, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, पोलीस उपनिरीक्षक टी. आर. पवार यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.