चोर मचाये शोर… शहरातील उपनगरात चोरट्यांचा धुमाकूळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 जुलै 2021 :-  गुन्हेगारीमध्ये सातत्याने सर्वांच्या पुढे एक पाऊल टाकत असलेला नगर जिल्हा गुन्हेगारीचे विक्रम तोडत आहे. जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिक देखील भयभीत झाले आहे.

एकीकडे हे सगळं सुरु असताना दुसरीकडे मात्र अपेक्षित गुन्ह्याची उकल होत नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहे. नुकतेच नगर शहरातील सावेडी उपनगरात दिवसेंदिवस चोर्‍या, घरफोड्या, सोन साखळी चोरीच्या घटना वाढत आहे.

चोरट्याच्या टोळीने बुधवारी पहाटे पाईपलाईन रोडवरील दोन मेडीकल व दोन फ्लॅट फोडले. मात्र, त्याठिकाणी त्यांच्या हाती फार काही लागले नाही. एका मेडिकलमधील रोख रक्कम व इतर साहित्य असा पाच हजार 600 रूपयांचा मुद्देमाल चोरीला गेला.

मेडिकलचे मालक भारत बाबासाहे घनवट (वय 27 रा. पाईपलाईन रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोडवर पाच ते सहा ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या.

यानंतर बुधवारी पहाटे पाईपलाईन रोडवर चार ठिकाणी चोरट्यांनी धुमाकूळ घातला. बालिकाश्रम व पाईपलाईन रोडवर चोरी करणारी टोळी एकच असल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शहरात एवढ्या चोऱ्या होत असताना देखील पोलीस प्रशासन मात्र कोणतीही ठोस भूमिका घेताना दिसून येत नाही आहे. यामुळे भयभीत झालेल्या नागरिकांमधून पोलीस प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला जातो आहे.

दरम्यान चोरट्यांची ही टोळी पकडण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या टोळीला अटक करण्याचे आवाहन त्यांच्यासमोर आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24