अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घेतला आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये देखील कमालीचे दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून ख्याती असलेले शिर्डीमध्ये देखील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
शिर्डी शहरात येणाऱ्या साईभक्तांचे मोबाईल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, त्यामुळे ग्रामस्थांसह साईभक्तांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मोबाईल चोरीचे रॅकेट उघडकीस आणण्यासाठी जिल्हा गुन्हा अन्वेषण विभाग आणि शिर्डी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या चोरांवर कारवाई होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.
शिर्डीत लाखो भाविक येतात. या भाविकांकडे महागडे मोबाईल असतात. चोर हे मोबाईल चोरतात. अशा प्रकरणात काही जण तक्रार देतात तर काही सिमसाठी नाहरकत दाखला घेऊन नशिबाला दोष देऊन निघून जातात.
त्यामुळे मोबाईल चोरांचे बळ वाढत आहे. मोबाईल चोरणारे वेगळे व त्याची विल्हेवाट लावणारे वेगळे लोक असतात. हे लोक टोळी बनवून काम करतात.
त्यामुळे असे काम करणाऱ्या मोबाईल खरेदी-विक्री करणाऱ्या दुकानदाराकडे देखील लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. फार काही कठोर कारवाई न झाल्याने मोबाईल चोरांचे वाढते धाडस त्रासदायक ठरू पाहत आहे.
शिर्डीसह परीसरात जुन्या मोबाईल खरेदी विक्रीच्या व्यवसायाने चांगलेच पाय रोवले आहे. काही लोक व तरुण मुले कागदपत्रांची खात्री न करता चोरीचे मोबाईल विकत घेतात. हे चोरांच्या पथ्थ्यावर पडत असावे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोबाईल चोरीला अटकाव घालणे सहज पोलिसांना शक्य आहे; परंतु लोकांचा निष्काळजीपणा व पोलीस खाते फार गंभीरपणे बघत नसल्याने शिर्डीसह परीसरात मोबाईल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढत आहे.