अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- जिल्ह्यात चोरी, लुटमारी आदी घटनानॆ धुमाकूळ घातला आहे. नुकतेच कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून महिलेच्या गळ्यातील सहा हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लुटून नेले.
दरम्यान या चोरटयांनी घरात घुसून संबंधित महिलेच्या पतीला बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले होते. पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत आरोपींना अटक केली आहे तसेच लुटीतील मुद्देमालासह एक दुचाकी हस्तगत केली आहे.
याप्रकरणी महिलेचे पती अशोक मारुती रांधवणे यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि, त्यावर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यंत्रणेमार्फत तपासाची सूत्रे हलविली.
एक आरोपी हा गोधेगाव शिवारात संशयितरित्या लपलेला आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव समाधान गोरख ठोंबरे (वय १९, रा. अंचलगाव, ता. कोपरगाव) असल्याचे निष्पन्न झाले.
हा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार ऋषिकेश शंकर पैठणकर व राजेंद्र लक्ष्मण जाधव (दोघे रा. टाकळी, ता. कोपरगाव) यांनी केला असल्याची पोलिसांना कबुली दिली.
त्यानंतर पैठणकर व जाधव या दोघांना पोलिसांनी अटक केली. आरोपींना शुक्रवारी कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.