अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. रात्रीच्या अंधारात होणाऱ्या चोऱ्या आता दिवसाढवळ्या होऊ लागल्या आहेत. चोऱ्यांचे प्रमाण वाढले मात्र गुन्ह्यांचा शोध घेण्याचे प्रमाण मात्र अल्प आहे.

यामुळे सध्या नागरिकांची सुरक्षा हि बेभरवशी आहे, असेच चित्र सध्या नगर शहरासह जिल्ह्यात दिसून येत आहे. नुकतेच नगर शहरातील कल्याण रोड परिसरात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे.

कल्याण रोड परिसरात या आठवड्यामध्ये पाच ते सहा ठिकाणी घरे, दुकानांमध्ये चोऱ्या झालेल्या आहेत. अनेकांच्या दुचाकीही चोरीला गेल्या आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत.

तसेच अनेकांनी त्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता रोजच चोरटे हातामध्ये लाठ्या-काठ्या घेऊन वावरत असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत स्थानिक नागरिकांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, कल्याण रोड परिसरामध्ये अनुसयानगर आनंदपार्क, विद्या कॉलनी, समतानगर,

आदर्श नगर परिसरात २६ ऑगस्टपासून दररोज मध्यरात्री चोरटे हत्यारे घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत आहेत. राजरोसपणे घराच्या दारे-खिडक्या तोडून घरात घुसत आहेत.

तसेच हत्याराचा धाक दाखवून चोऱ्या करत आहेत. या सर्व घटनेने कल्याण रोडवरील नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागामध्ये पोलिसांकडून गस्त घातली जात नाही.

त्यामुळे चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. पोलिसांनी या भागात गस्त घालावी व नागरिकांना सुरक्षा द्यावी. या चोरट्यांचा तत्काळ बंदोबस्त लावण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी कोतवाली पोलिसांकडे केली आहे.